
चालू घडामोडी | 'राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-6' (NFHS-6) ची आकडेवारी जाहीर
National Family Health Survey (NFHS)-6
📚 Subject : GS - रिपोर्ट
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-6 (NFHS-6) नुसार, भारताचा एकूण प्रजनन दर (Total Fertility Rate) सध्या खालीलपैकी किती अंकावर स्थिर आहे ?
- 1.5
- 2.0
- 2.4
- 2.8
उत्तर : 2.0
📰 बातमी काय ?
• केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoHFW) बहुप्रतिक्षित 'राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-6' (NFHS-6) ची आकडेवारी जाहीर केली आहे.
🏛️ 'राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-6' अंमलबजावणी आणि व्याप्ती -
• सर्वेक्षण वर्ष 2023-24 दरम्यान घेण्यात आले.
• यासाठी 'इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस' (IIPS), मुंबई ही नोडल संस्था (Nodal agency) म्हणून कार्यरत होती.
• व्याप्ती - देशातील 715 जिल्ह्यांमधील सुमारे 6.79 लाख कुटुंबांचा यात समावेश करण्यात आला असून, हा डेटा जिल्हा पातळीवरील पुराव्यांवर आधारित नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
'राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-6' सर्वेक्षणातील प्रमुख निष्कर्ष -
🤰 माता आणि बाल आरोग्य (Maternal and Child Healthcare) -
1) गर्भधारणा काळजी (ANC) : सुमारे 95.9% गरोदर महिलांना प्रसूतीपूर्व काळजी (Antenatal Care) मिळाली.
पहिल्या त्रैमासिकात (First trimester) काळजी घेणाऱ्या मातांचे प्रमाण 70.0% वरून 76.2% झाले आहे.
2) संस्थात्मक प्रसूती (Institutional Deliveries) - रुग्णालयातील प्रसूतीचे प्रमाण 88.6% वरून 90.6% वर पोहोचले आहे.
सी-सेक्शन प्रसूतीची चिंता - सिझेरियन (C-Section) प्रसूतीचे प्रमाण 21.5% वरून थेट 27.2% वर गेले आहे.
विशेषतः शहरी भागात हे प्रमाण 40% आहे, जे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 10-15% च्या इष्टतम मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे.
3) पोषण आहार - गरोदरपणात 100 दिवस किंवा त्याहून अधिक काळ आयर्न फॉलिक ॲसिड (IFA) गोळ्या खाणाऱ्या मातांचे प्रमाण 44.1% वरून 54.9% झाले आहे.
👶 बाल लसीकरण आणि बाल पोषण (Child Immunization & Nutrition)
1) पूर्ण लसीकरण - 12-23 महिने वयाच्या बालकांचे पूर्ण लसीकरण 83.8% वरून 87.1% झाले आहे. यातील 95.6% मुलांचे लसीकरण सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये झाले.
2) कुपोषणामध्ये घट - 5 वर्षांखालील मुलांमधील खालील महत्त्वाचे निर्देशांक सुधारले आहेत -
➔ स्टंटिंग (Stunting - वयाच्या मानाने कमी उंची) : 35.5% वरून कमी होऊन 29.3% वर आले.
➔ सिव्हियर वेस्टिंग (Severe Wasting - उंचीच्या मानाने अत्यंत कमी वजन) : 7.7% वरून घटून 5.2% झाले.
➔ अंडरवेट (Underweight - वयाच्या मानाने कमी वजन) : 32.1% वरून 31.8% इतके किंचित कमी झाले.

👩 महिला सक्षमीकरण आणि आरोग्य संरक्षण (Women Empowerment & Health Protection)
1) डिजिटल आणि वित्तीय समावेशन - इंटरनेट वापरणाऱ्या महिलांचे प्रमाण जवळपास दुप्पट होऊन 33.3% वरून 64.3% झाले आहे.
स्वतःचे बँक खाते वापरणाऱ्या महिला 89.0% तर स्वतःचा मोबाईल वापरणाऱ्या महिला 63.6% आहेत.
2) आरोग्य विमा विस्तार - कुटुंब पातळीवर आरोग्य विमा किंवा आरोग्य वित्तपुरवठा योजनांचे कवच 41.0% वरून थेट 60.2% पर्यंत वाढले आहे.
3) एकूण प्रजनन दर (Total Fertility Rate) - भारताचा एकूण प्रजनन दर 2.0 वर स्थिर आहे.
भारताचा एकूण प्रजनन दर हा लोकसंख्या स्थिरीकरणाच्या दृष्टीने हे 2.1 च्या आदर्श लक्ष्याजवळ आहे).

✍️ संकल्पना : एकूण प्रजनन दर (Total Fertility Rate) म्हणजे काय ?
• एका महिलेने तिच्या संपूर्ण जननक्षम कालावधीत (Childbearing years - साधारणपणे वय वर्षे 15 ते 49) सरासरी किती मुलांना जन्म दिला, ती संख्या म्हणजे 'एकूण प्रजनन दर' (TFR) होय.
• उदाहरणावरून समजून घेऊ: जर एखाद्या देशाचा TFR 2.0 असेल, तर याचा अर्थ असा की त्या देशात सरासरी एका महिलेमागे 2 मुले जन्माला येत आहेत.
🧐 लोकसंख्या स्थिरता दर (Replacement Level Fertility) म्हणजे काय ?
• कोणत्याही देशाची लोकसंख्या न वाढता आणि न घटता स्थिर राहण्यासाठी TFR 2.1 असणे आवश्यक मानले जाते. यालाच 'रिप्लेसमेंट लेव्हल' म्हणतात. (2 मुलांमागे आई आणि वडील रिप्लेस होतात, तर 0.1 चा फरक बालमृत्यूदराचा समतोल साधण्यासाठी असतो).
✍️ निष्कर्ष आणि आव्हाने (Conclusion & Way Forward)
1) सकारात्मक बाजू - माता-बाल आरोग्य, बाल पोषण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य विम्याच्या क्षेत्रात भारताने सातत्यपूर्ण प्रगती केली असून, देश शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्याच्या दिशेने योग्य मार्गावर आहे.
2) नवीन आव्हाने - संसर्गजन्य नसलेले आजार (NCDs) वाढणे, तसेच प्रौढांमध्ये एकाच वेळी कुपोषण (Undernutrition) आणि लठ्ठपणा (Obesity) वाढणे यांसारख्या दुहेरी समस्येमुळे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेवर अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : 'राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-6'
• NFHS-6 सर्वेक्षणाचा कालावधी ➔ वर्ष 2023-24
• सर्वेक्षण करणारी नोडल संस्था ➔ IIPS, मुंबई
• भारताचा एकूण प्रजनन दर (TFR) ➔ 2.0 (स्थिर)
• बालकांमधील स्टंटिंगचे सुधारलेले प्रमाण ➔ 29.3%. (कमी झाले)
• शहरी भागातील सिझेरियन (C-section) दर ➔ 40% (WHO मर्यादेपेक्षा जास्त)
• इंटरनेट वापरणाऱ्या महिलांचे प्रमाण ➔ 64.3% (जवळपास दुप्पट वाढले)
• आरोग्य विमा कवच लाभलेली कुटुंबे ➔ 60.2% (वाढले)





















