
चालू घडामोडी 05, जुलै 2025 | अल्लुरी सीताराम राजू यांची जयंती | Birth Anniversary of Alluri Sitarama Raju

अल्लुरी सीताराम राजू यांची जयंती
Birth Anniversary of Alluri Sitarama Raju
Subject : GS - इतिहास : क्रांतिकारक
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अल्लुरी सीताराम राजू हे भारतातील कोणत्या राज्यातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक होते ?
(SSC MTS 2022)
1. गुजरात
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. बिहार
उत्तर : आंध्र प्रदेश
जन्म, शिक्षण आणि सन्यास :
• अल्लुरी सीताराम राजू हे एक भारतीय क्रांतिकारक होते त्यांनी भारतातील ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढा दिला.
• अल्लुरी सीताराम राजू यांचा जन्म 4 जुलै 1897 (काही ठिकाणी 4 जुलै 1898) रोजी सध्याच्या आंध्र प्रदेशातील भीमावरम जवळील मोगल्लू गावात झाला.
• अल्लुरी राजू यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या गावी झाले आणि नंतर ते पुढील शिक्षणासाठी विशाखापट्टणमला गेले.
• 18 व्या वर्षी त्यांनी भौतिक सुखांचा त्याग केला आणि संन्यासी जीवन स्वीकारले .
आदिवासी समाजाचे संघटन आणि उपदेश :
• तरुण संन्यासी म्हणून पूर्व घाटाच्या जंगली टेकड्यांमधून प्रवास करताना त्यांचे आदिवासी लोकांशी असलेले खोल नाते अधिकच वाढले.
• त्यांनी जंगलात राहणाऱ्या आदिवासींना दारू सोडण्यासाठी उपदेश केला.
• त्यांनी आदिवासींमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला.
• ब्रिटिश शासन अशिक्षित व गरीब आदिवासींचे शोषण करीत होते.
• अल्लुरी सीताराम राजूंनी ब्रिटिशांच्या विरोधात आदिवासींमध्ये जागृती निर्माण करून ब्रिटिशांपासून भारताला स्वतंत्र करण्यासाठी आदिवासी समाजाला संघटित केले आणि ब्रिटिशांच्या विरोधात रम्पा उठाव केला.
• स्थानिक आदिवासी समुदाय त्यांचा आदर करत होते, त्यांना एक नेता म्हणून पाहत होते जो ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लागू केलेल्या दडपशाही धोरणांपासून त्यांना मुक्त करेल.
• त्याच्या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे स्थानिक गावकऱ्यांनी अल्लुरी सीताराम राजू यांना "मन्यम वीरडू" (जंगलाचा नायक) ही उपाधी दिली.
रम्पा उठाव (Rampa Rebellion) : 1922 ते 1924

रम्पा उठावाचे प्रमुख कारण कोणते ?
• रम्पा प्रशासकीय क्षेत्रात बहुतेक आदिवासी लोकसंख्या होती.
• येथील आदिवासी लोक पोडू शेती करत असत.
• पोडू शेतीला झुम किंवा स्थलांतरित शेती असेही म्हणतात
• ज्यामध्ये शेतीसाठी वनजमिनीचा काही भाग साफ करणे आणि काही वर्षांनी इतर भागात स्थलांतर करणे समाविष्ट होते.
• ही त्यांची पारंपारिक आणि शाश्वत जीवनशैली होती.
• रेल्वे आणि जहाजे बांधण्यासाठी तसेच अन्य कारणांसाठी ब्रिटिशांना जंगलाच्या जमिनीचा ताबा घ्यायचा होता.
• ब्रिटिशांकडून 1882 च्या मद्रास वन कायद्याने ही पारंपरिक शेती करण्यास बंदी घालण्यात आली.
• या व्यावसायिक शोषणाचा स्थानिक आदिवासी लोकांवर मोठा परिणाम झाला.
• जंगली टेकड्यांवरील या आदिवासी लोकांना उपासमारीचा सामना करावा लागला.
• अशाप्रकारे, रम्पा उठाव प्रामुख्याने मद्रास वन कायदा, 1882 च्या संमत होण्याच्या विरोधात होता.
रम्पा उठावाचे नेतृत्व कोणी केले ?
Who led the Rampa Revolt ?
• 1922 चा रंपा उठाव, ज्याला मन्यम उठाव (Manyam Rebellion) असेही म्हणतात.
• हा ब्रिटिशांविरूद्ध अल्लुरी सीताराम राजू यांच्या नेतृत्वाखालील एक आदिवासी उठाव होता.
• अल्लुरी सीताराम राजूंनी संपूर्ण रम्पा क्षेत्राला क्रांतिकारी आंदोलनाचे केंद्र बनविले होते.
• पारंपरिक शस्त्रांनी ब्रिटिशांचा सामना करणे कठीण होते; त्यामुळे आधुनिक शस्त्रे प्राप्त करण्यासाठी त्यांनी दरोडे घालणे सुरू केले, त्यांतून मिळणाऱ्या पैशाने शस्त्रखरेदी केली.
• अल्लुरी सीताराम राजूंनी त्यांच्या सहकाऱ्यां सोबत पोलीस ठाण्यावर हल्ला करून शस्त्रे लुटली.
• मृत्यू : 7 मे 1924 रोजी ब्रिटिश सैन्याविरोधात झालेल्या चकमकीमध्ये अल्लुरी सीताराम राजू यांचा मृत्यू झाला.
• ऑगस्ट 1922 मध्ये सुरू झालेला हा उठाव मे 1924 मध्ये अल्लुरी सीताराम राजू यांच्या मृत्यूनंतर संपला.