
चालू घडामोडी 01, एप्रिल 2025 | म्यानमार भूकंप | Myanmar Earthquake

म्यानमार भूकंप
Myanmar Earthquake
Subject : GS - भूगोल - भूकंप
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मार्च 2025 रोजी आलेल्या म्यानमार भूकंपाची तीव्रता किती होती ?
1. 3.8
2. 4.6
3. 5.8
4. 7.7
उत्तर : 7.7 (रिश्टर स्केल)
बातमी काय आहे ?
• म्यानमार आणि थायलंडमध्ये 28 मार्च 2025 भूकंपाचे तीव्र धक्के बसले.
म्यानमार भूकंपा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• 28 मार्च 2025 रोजी म्यानमारमध्ये एका शक्तिशाली भूकंपात अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि मोठ्या संख्येने लोक जखमी झाले.
• म्यानमार आणि थायलंडमध्ये दुपारी 12:50 वाजता 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला, त्यानंतर केवळ 12 मिनिटांत 6.4 तीव्रतेचा भूकंपाचा दुसरा धक्का लागला.
• भूकंपाचं केंद्र पृथ्वीच्या 10 किलोमीटर खाली म्यानमारच्या मांडले शहराजवळ असल्याचं अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हेने म्हटलंय.
• हा भूकंप गेल्या दोन वर्षांत जगात आलेला हा सर्वात शक्तिशाली भूकंप होता.
म्यानमारमधील भूकंपाचे मुख्य कारण कोणते ?
• म्यानमारमधील भूकंप सागाईंग फॉल्ट या ठिकाणी "स्ट्राइक-स्लिप फॉल्टिंग" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका प्रकारच्या फॉल्टिंगमुळे झाला.
सागाईंग फॉल्ट (Sagaing Fault) म्हणजे काय ?
• सागाईंग फॉल्ट ही म्यानमारमधून उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी एक प्रमुख सक्रिय टेक्टोनिक सीमा (Tectonic Boundary) आहे, जी भारतीय आणि युरेशियन प्लेट्सना वेगळे करते.
• सागाईंग फॉल्ट म्यानमारमधून 1500 किमी लांब पसरलेला आहे.
भ्रंश किंवा प्रस्तरभंग ( Fault) म्हणजे काय ?
• भूकंपाच्या ताणामुळे खडक हलतात तेव्हा पृथ्वीच्या कवचात होणारे फ्रॅक्चर (Fracture) म्हणजे भ्रंश.
• भूकवचावर भूगर्भीय हालचालीमुळे एका ठिकाणी दाब पडतो तर दुसऱ्या ठिकाणी तणाव निर्माण होतो.
• त्यामुळे खडकावर तडे पडतात या क्रियामुळे काही भ्रंश पातळीच्या खाली खचले जातात तर काही भाग वर उचलले जातात यालाच भ्रंश किंवा प्रस्तरभंग ( Fault) असे म्हणतात.
भ्रंशाचे प्रमुख 3 प्रकार कोणते ?
सामान्य भ्रंश, व्युत्क्रम भ्रंश आणि अपक्षय भ्रंश हे भ्रंशाचे प्रमुख 3 प्रकार आहेत.
1) सामान्य भ्रंश (Normal Fault) :
• सामान्य भ्रंश मध्ये फॉल्टच्या वरील ब्लॉक खालील ब्लॉकच्या सापेक्ष खाली सरकतो.
• गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार खडकांचे स्थानांतर होते.
• उदाहरणार्थ : पूर्व आफ्रिकन खचदरी (East African Rift Valley)

2) व्युत्क्रम भ्रंश (Reverse Fault) :
• भ्रंश पातळीवर खडकाचे भाग एकमेकांकडे सरकतात अशी क्रिया गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने होते म्हणून यास व्युत्क्रम भ्रंश म्हणतात.
• व्युत्क्रम भ्रंश मध्ये वरचा ब्लॉक खालच्या ब्लॉकवर सरकतो.
• या प्रकारची फॉल्टिंग दाब पडल्यामुळे होते.
• उदाहरणार्थ : हिमालय पर्वतरांगा, रॉकी पर्वतरांगा

3) अपक्षय भ्रंश (Strike-Slip Fault) :
• खडकाच्या भागांचे स्थानांतर वर-खाली न होता क्षितिजसमांतर दिशेने होते यास अपक्षय भ्रंश किंवा विदारण भ्रंश असे म्हणतात.
• उदाहरणार्थ : म्यानमारमधील सागाईंग फॉल्ट, तुर्कीमधील अनाटोलियन फॉल्ट
