
चालू घडामोडी | कामागाटामारू घटना काय आहे ?
The Komagata Maru Incident
📚 Subject : GS - इतिहास - आधुनिक भारताचा इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 1914 मधील 'कामागाटामारू' (Komagata Maru) घटनेमध्ये 'कामागाटामारू' हे खालीलपैकी काय होते ?
- एका क्रांतिकारक संघटनेचे नाव
- कॅनडाच्या जाचक कायद्याचे नाव
- जहाजाचे नाव
- पंजाबमधील एका शहराचे नाव
उत्तर : जहाजाचे नाव
📰 बातमी काय ?
• प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याने अमेरिकेतील लोकप्रिय 'द टुनाईट शो स्टारिंग जिमी फॅलन' (The Tonight Show Starring Jimmy Fallon) या कार्यक्रमात 'कोमागाता मारू' या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख केल्यामुळे हा विषय पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चर्चेत आला आहे.
📜 पंजाबमधील पार्श्वभूमी:
• 1900 च्या सुरुवातीला पंजाबमध्ये ग्रामीण कर्जबाजारीपणा आणि साथीच्या रोगांमुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली होती.
• त्यामुळे ब्रिटीश भारतीय सैन्यातील माजी सैनिक आणि शेतकरी परदेशात स्थलांतर करत होते.
• भारत आणि कॅनडा हे दोन्ही देश त्यावेळी ब्रिटीश साम्राज्याचा (British Empire) भाग होते.
• भारतात मिळणाऱ्या मजुरीच्या तुलनेत कॅनडामध्ये 10 ते 15 पटीने जास्त वेतन मिळत होते. हा आर्थिक फायदा पंजाबमधील लोकांना परदेशात आकर्षित करणारा सर्वात मोठा घटक ठरला.
🧐 कामागाटामारू घटना (1914) काय आहे ?
1) नाव - 'कामागाटामारू' (Komagata Maru) हे एका जपानी वाफेवरील जहाजाचे नाव होते.
• या जहाजाला 'गुरू नानक जहाज' म्हणूनही ओळखले जात असे.
2) नेतृत्व - पंजाबमधील एक श्रीमंत कंत्राटदार बाबा गुरदित सिंग संधू यांनी हे जहाज हाँगकाँगहून भाड्याने घेतले होते.
3) प्रवासी - या जहाजातून पंजाबमधील 376 भारतीय प्रवासी ब्रिटिश भारतामधून कॅनडातील व्हँकुव्हर शहराकडे निघाले होते.
4) प्रवासाचा मुख्य उद्देश : जाचक कायद्याला आव्हान -
• कॅनडा सरकारने 1908 मध्ये 'कन्टीन्युअस जर्नी रेग्युलेशन' (Continuous Journey Regulation 1908) नावाचा एक वर्णद्वेषी कायदा केला होता.
• या कायद्यानुसार, कोणताही स्थलांतरित नागरिक जर कॅनडात येत असेल, तर त्याने आपल्या देशातून निघताना थेट आणि न थांबता प्रवास करून येणे बंधनकारक होते.
• तसेच तिकीटही मूळ देशातूनच घेतलेले असावे अशी अट होती.
• भारतामधून कॅनडासाठी थेट सागरी प्रवास उपलब्ध नसल्याने, हा कायदा म्हणजे पर्यायाने आशियाई आणि विशेषतः भारतीय नागरिकांना कॅनडात येण्यापासून रोखण्यासाठी घातलेली एक छुपी बंदी होती.
• बाबा गुरदित सिंग यांना या कायद्याला कायदेशीर आव्हान द्यायचे होते.
🧐 व्हँकुव्हरमधील संघर्ष काय होता ?
1) प्रवेश नाकारला -
• मे 1914 मध्ये जेव्हा हे जहाज कॅनडाच्या व्हँकुव्हर बंदरावर पोहोचले, तेव्हा तिथल्या प्रशासनाने प्रवाशांना बंदरावर उतरण्यास नकार दिला.
• केवळ पूर्वीच कॅनडाचे नागरिकत्व सिद्ध करू शकलेल्या 24 प्रवाशांनाच उतरू दिले गेले.
2) किनारा समिती (Shore Committee):
• स्थानिक भारतीयांनी प्रवाशांच्या बाजूने न्यायालयात लढण्यासाठी हुसैन रहीम, सोहनलाल पाठक आणि बलवंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली 'शोअर कमिटी' स्थापन केली.
• मात्र, कॅनडाच्या न्यायालयाने सरकारचा कायदा वैध ठरवला.
3) सक्तीने परत पाठवले -
• प्रवाशांचे अन्न आणि पाणी रोखण्यात आले.
• शेवटी, जुलै 1914 मध्ये कॅनडाच्या नौदलाच्या संरक्षणात या जहाजाला सक्तीने कॅनडाच्या पाण्यातून हाकलून देण्यात आले.
✍️ बज बज बंदरावरील हत्याकांड (Budge Budge Riot):
• सप्टेंबर 1914 मध्ये हे जहाज भारतात परतले आणि कोलकात्याजवळील बज बज (Budge Budge) बंदरावर थांबले.
ब्रिटीश सरकारने या प्रवाशांना संशयित क्रांतीकारक मानले आणि त्यांना थेट पंजाबला जाणाऱ्या विशेष ट्रेनमध्ये बसण्याची सक्ती केली.
• प्रवाशांनी याला नकार देऊन कोलकात्याच्या दिशेने मोर्चा काढला असता, ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला.
यात 20 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि अनेकांना तुरुंगात डांबण्यात आले.
• बाबा गुरदित सिंग 1920 पर्यंत पोलिसांना चकवा देत राहिले, शेवटी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून त्यांनी आत्मसमर्पण केले.
✍️ या घटनेचे ऐतिहासिक महत्त्व (Significance):
1) गदर चळवळीला बळ -
• या घटनेमुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयांमध्ये संताप पसरला.
• 'ब्रिटिश साम्राज्यात भारतीयांना सन्मान नाही आणि सशस्त्र क्रांती हाच एकमेव मार्ग आहे', याची खात्री पटल्याने हजारो लोक " 'गदर पार्टी'"मध्ये सामील झाले.
2) ब्रिटीश दुटप्पीपणा उघड -
• एकीकडे पहिल्या महायुद्धात (WWI) ब्रिटन भारतीयांना सैन्यात भरती होऊन लढायला सांगत होता, तर दुसरीकडे स्वतःच्याच इतर वसाहतींमध्ये भारतीयांना जनावरांसारखी वागणूक दिली जात होती, हा दुटप्पीपणा जगासमोर आला.
3) कॅनडा सरकारची माफी -
• या ऐतिहासिक शोकांतिकेबद्दल 2016 मध्ये कॅनडाच्या पंतप्रधानांनी तिथल्या संसदेत (House of Commons) अधिकृतपणे जाहीर माफी मागितली.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : कामागाटामारू घटना काय आहे ?
• कोमागाता मारू (1914) → जपानी वाफेवर चालणारे जहाज.
• मुख्य प्रणेते → पंजाबी उद्योजक बाबा गुरदित सिंग.
• कॅनडाचा जाचक कायदा → इमिग्रेशन प्रतिबंधासाठी 'कंटिन्युअस जर्नी रेग्युलेशन, 1908'.
• भारतातील शोकांतिका → बजबज (Budge Budge) गोळीबार, कोलकाता (सप्टेंबर 1914 - 20 मृत).
• संबंधित क्रांतीकारी चळवळ → गदर चळवळ
















