
चालू घडामोडी | जालियनवाला बाग हत्याकांड
Jallianwala Bagh Massacre
📚 Subject : GS - दिनविशेष, इतिहास - आधुनिक भारताचा इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न 1 ) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या दिवशी घडला ?
1. 13 एप्रिल 1909
2. 13 एप्रिल 1916
3. 13 एप्रिल 1919
4. 13 एप्रिल 1921
उत्तर : 13 एप्रिल 1919
📰 बातमी काय ?
• 13 एप्रिल 2026 रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या 107 व्या स्मृतिदिनानिमित्त देशभरात शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
• ही घटना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ब्रिटिशांच्या सर्वात क्रूर घटनांपैकी एक मानली जाते.
📜 पार्श्वभूमी: रौलट कायदा आणि जनक्षोभ :
1) रौलट कायदा (1919) -
• सिडिशन कमिटीच्या (Sedition Committee) शिफारशीनुसार ब्रिटीश सरकारने हा कायदा संमत केला.
• या कायद्यानुसार कोणत्याही भारतीयाला विनाचौकशी 2 वर्षांपर्यंत तुरुंगात डांबण्याचे अधिकार सरकारला मिळाले.
2) महात्मा गांधीजींची प्रतिक्रिया -
• महात्मा गांधींनी याला 'काळा कायदा' संबोधले आणि 6 एप्रिल 1919 रोजी देशव्यापी हडताळ पुकारला.
• हा त्यांच्या नेतृत्वाखालील पहिला देशव्यापी सत्याग्रह होता.
3) पंजाबमधील तणाव -
• पंजाबमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.
• 9 एप्रिल रोजी डॉ. सैफुद्दीन किचलू आणि डॉ. सत्यपाल या दोन प्रमुख नेत्यांना अटक करून हद्दपार करण्यात आले.
• यामुळे जनक्षोभ उसळला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने अमृतसरचा ताबा ब्रिगेडियर जनरल रेजिनल्ड डायर याच्याकडे सोपवण्यात आला.
⏳ हत्याकांडाची घटना : 13 एप्रिल 1919
1) निमित्त -
• हा दिवस बैसाखी या सणाचा होता.
• अमृतसरमधील जालियनवाला बाग या बंदिस्त मैदानावर हजारो नागरिक जमले होते.
2) सभेचे स्वरूप -
• यातील बहुतांश लोक सणानिमित्त आलेले गावकरी होते, तर काही लोक नेत्यांच्या अटकेचा शांततापूर्ण निषेध करत होते.
• जनरल डायरने पुकारलेल्या जमावबंदीबद्दल अनेकजण अनभिज्ञ होते.
3) नरसंहार -
• जनरल डायरने बागेचा एकमेव अरुंद मुख्य दरवाजा लष्करी तुकडीसह अडवला.
• जमलेल्या निशस्त्र जमावाला पांगण्याची कोणतीही पूर्वसूचना न देता त्याने थेट गोळीबाराचे आदेश दिले.
• या अमानुष कृत्यात 1,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता.

⚖️ चौकशी समित्या :
1) हंटर कमिशन -
• ब्रिटीश सरकारने या हत्याकांडाच्या चौकशीसाठी 'डिसऑर्डर्स इन्क्वायरी कमिटी' (हंटर कमिशन) नेमली.
• या समितीने डायरच्या कृतीवर ताशेरे ओढले आणि त्याला लष्करी सेवेतून राजीनामा देण्यास भाग पाडले, परंतु त्याच्यावर कोणतीही फौजदारी कारवाई केली नाही.
2) काँग्रेसची चौकशी समिती -
• भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने हंटर कमिशनवर बहिष्कार टाकला आणि आपली स्वतःची समिती नेमली.
• यामध्ये महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, सी.आर. दास आणि अब्बास तय्यबजी यांचा समावेश होता.
• या समितीने या घटनेला "नियोजित अमानुषता" म्हटले.
🤔 ऐतिहासिक परिणाम आणि पडसाद :
1) पदव्यांचा त्याग -
• या घटनेच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी आपली ब्रिटीश 'नाईटहूड' (सर) पदवी त्यागली,
• तर महात्मा गांधी यांनी 'कैसर-ए-हिंद' ('Kaiser-i-Hind') पदक सरकारला परत केले.
2) सर चेट्टूर संकरन नायर यांचा राजीनामा -
• व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य सर चेट्टूर संकरन नायर यांनी निषेध म्हणून राजीनामा दिला.
• त्यांनी त्यांच्या 1922 मधील 'गांधी अँड अनार्की' ('Gandhi and Anarchy') या पुस्तकात मायकेल ओ'डवायरला जबाबदार धरले.
3) असहकार चळवळ -
या हत्याकांडाने निर्माण झालेल्या संतापामुळे गांधीजींनी 1920-1922 दरम्यान असहकार चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला.
4) क्रांतिकारी चळवळ -
या घटनेने भगतसिंग यांच्यासारख्या तरुण पिढीवर खोलवर परिणाम केला, ज्यामुळे उत्तर भारतात सशस्त्र क्रांतीचा जोर वाढला.
⚔️ ऐतिहासिक बदला (Historical Retribution) :
• उधम सिंग - या हत्याकांडाचा बदला म्हणून 13 मार्च 1940 रोजी लंडनमध्ये उधम सिंग यांनी मायकेल ओ'डवायर (Michael O'Dwyer) याची हत्या केली.
• ओ'डवायर हा 1919 मध्ये पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर होता आणि त्याने डायरच्या कारवाईचे अधिकृतपणे समर्थन केले होते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• जालियनवाला बाग हत्याकांड — 13 एप्रिल 1919
• ठिकाण — अमृतसर (पंजाब)
• गोळीबार आदेश — जनरल रेजिनाल्ड डायर
• चौकशी — हंटर आयोग
• रवींद्रनाथ टागोर - निषेधार्थ 'नाईटहूड' (सर) पदवीचा त्याग
• महात्मा गांधी - 'कैसर-ए-हिंद' पदक सरकारला परत केले
















