
चालू घडामोडी | ‘शहरी उष्णता बेट' म्हणजे काय ?
Urban Heat Island
📚 Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) तीव्र नागरीकरणामुळे नैसर्गिक भूपृष्ठाचे काँक्रीटीकरण झाल्याने शहरांची 'सौर विकिरण परावर्तित करण्याची क्षमता' (Albedo) कमालीची घटते. या भौगोलिक बदलामुळे शहरांमध्ये खालीलपैकी कोणती पर्यावरणीय समस्या प्रामुख्याने उद्भवते?
1. जागतिक तापमानवाढ (Global Warming)
2. ओझोन थराचे विरलीकरण (Ozone Depletion)
3. शहरी उष्णता बेट प्रभाव (Urban Heat Island Effect)
4. भूपृष्ठीय तापमान व्युत्क्रमण (Surface Temperature Inversion)
उत्तर : शहरी उष्णता बेट प्रभाव (Urban Heat Island Effect)
📰 बातमी काय ?
• उत्तर आणि मध्य भारतामध्ये आलेल्या अत्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे (Intense Heatwave), देशातील प्रमुख शहरांमध्ये ‘शहरी उष्णता बेट' (अर्बन हीट आयलंड') चा प्रभाव प्रचंड वाढला असून पर्यावरणीय चिंतेचा विषय बनला आहे.
🤔 संकल्पना - 'अर्बन हीट आयलंड' म्हणजे काय ?
• व्याख्या - ‘शहरी उष्णता बेट' किंवा अर्बन हीट आयलंड (UHI) म्हणजे नागरीकरणाचा असा एक विशिष्ट भूप्रदेश किंवा शहरी भाग, जिथले तापमान मानवी उपक्रम आणि सिमेंट-काँक्रीटच्या पायाभूत सुविधांमुळे त्याच्या सभोवतालच्या ग्रामीण भागाच्या (Surrounding Rural Areas) तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त असते.
• तापमानातील फरक - या प्रभावामुळे एकाच मोठ्या शहरात किंवा विशिष्ट परिसरामध्ये ग्रामीण भागापेक्षा तब्बल 6°C पर्यंत तापमानाचा फरक जाणवू शकतो.
🤔 'अर्बन हीट आयलंड' साठी जबाबदार असणारे प्रमुख घटक कोणते ?
A) काँक्रीटचे जंगल आणि बांधकाम (Built Environment):
• शहरी बांधकामांमध्ये सिमेंट-काँक्रीट (Concrete) आणि डांबराचा (Asphalt) मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो
• हे पदार्थ दिवसा सूर्यप्रकाशामुळे मिळणारी उष्णता स्वतःमध्ये मोठ्या प्रमाणात शोषून घेतात आणि ती दीर्घकाळ धरून ठेवतात, ज्यामुळे स्थानिक तापमान वाढते.
B) अल्बेडो प्रभाव (Albedo Effect):
अल्बेडो म्हणजे काय ? -
• कोणत्याही पृष्ठभागाची सूर्यप्रकाश किंवा सौर ऊर्जा परावर्तित (Reflect) करण्याची जी क्षमता असते, त्याला 'अल्बेडो' म्हणतात.
• शहरांमधील बदल - नागरीकरणामुळे नैसर्गिक हिरवे पृष्ठभाग बदलून कृत्रिम काँक्रीटचे पृष्ठभाग तयार केले जातात.
• यामुळे शहरांचा अल्बेडो (सूर्यप्रकाश परावर्तित करण्याची क्षमता) अत्यंत कमी होतो आणि ते जास्त उष्णता शोषून घेतात.
C) वनस्पतींची घटती संख्या (Reduced Vegetation):
• ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमध्ये झाडे, जंगले आणि हिरवे पट्टे (Green Spaces) खूप कमी असतात
• संकल्पना - बाष्पोत्सर्जन (Transpiration): झाडे त्यांच्या पानांमधून पाण्याचे बाष्प हवेत सोडतात, ज्याला 'बाष्पोत्सर्जन' म्हणतात. यामुळे आजूबाजूच्या हवेत ते मिळून हवा थंड करण्यासाठी मदत करतात.
• शहरांमध्ये झाडे कमी असल्याने हा नैसर्गिक थंडावा (Cooling Effect) नष्ट होतो.
D) मानवी हस्तक्षेप आणि उत्सर्जित उष्णता (Human Activities):
• शहरांमधील वाहनांची वाहतूक (Transportation), कारखाने-उद्योग (Industry) आणि मोठ्या प्रमाणावर होणारा ऊर्जेचा वापर (उदा. लाखो एअर कंडिशनर्स आणि रेफ्रिजरेटर) यामुळे हवेत अतिरिक्त उष्णता सोडली जाते, जी शहराचे तापमान आणखी वाढवते.
🚨 ‘शहरी उष्णता बेट' मुळे निर्माण होणाऱ्या मुख्य चिंता आणि परिणाम कोणते ?
A) आरोग्यावरील गंभीर परिणाम (Health Impact):
• शहरातील नागरिकांमध्ये, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींमध्ये अतिउष्णतेमुळे शारीरिक थकवा (Heat Exhaustion) आणि थेट उष्माघात (Heatstroke) होण्याचा धोका प्रचंड वाढतो.
B) ऊर्जेचा अतिवापर (Energy Consumption) :
• शहराचे तापमान वाढल्यामुळे घर आणि कार्यालये थंड ठेवण्यासाठी - AC, कुलर्स आणि पंखे यांच्या अधिक वापरामुळे विजेची मागणी प्रचंड वाढते.
• यामुळे ऊर्जेचा वापर वाढून पर्यायाने वीज निर्मिती दरम्यान हरितगृह वायूंचे (Greenhouse Gases) उत्सर्जन वाढते आणि 'ग्लोबल वॉर्मिंग'अजून वाढण्यास गती मिळते.
C) जल व्यवस्थापनात बिघाड (Water Management):
• अर्बन हीट आयलंड (UHI) मुळे स्थानिक पातळीवरील बाष्पीभवनाचा दर (Evaporation Rates) बदलतो, ज्यामुळे स्थानिक जलचक्र विस्कळीत होते.
• तसेच, शहरांमधील डांबरीकरणामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरल्यामुळे भूजल पुनर्भरण (Groundwater Recharge) अत्यंत कमी होते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स - Urban Heat Island
- ‘शहरी उष्णता बेट' → ग्रामीण भागापेक्षा शहरी भागाचे तापमान जास्त असणे.
- कमाल तापमानातील संभाव्य फरक → 6°C पर्यंत
- कारण →
- काँक्रीटचे जंगल आणि बांधकाम
- अल्बेडो प्रभाव
- वनस्पतींची घटती संख्या
- मानवी हस्तक्षेप आणि उत्सर्जित उष्णता
- संबंधित जागतिक समस्या → हरितगृह वायू उत्सर्जन आणि भूजल पातळी कमी होणे.























