
चालू घडामोडी | महाड सत्याग्रह

Mahad Satyagraha
📚 Subject : GS - इतिहास - आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महाड सत्याग्रहाचा मुख्य उद्देश काय होता ?
1. मंदिर प्रवेशाचा अधिकार मिळवणे
2. सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांवर समान हक्क मिळवणे
3. शिक्षणाचा प्रसार करणे
4. स्वातंत्र्य मिळवणे
उत्तर : सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांवर समान हक्क मिळवणे
📰 बातमी काय ?
• महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या 99 व्या वर्धापन दिनानिमित्त 20 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र शासन स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
• चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
• या प्रकल्पासाठी 55 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
‘सामाजिक सशक्तीकरण दिन’ केव्हा असतो ?
• 20 मार्च हा दिवस देशभरात ‘सामाजिक सशक्तीकरण दिन’ (Social Empowerment Day)म्हणूनही साजरा केला जातो.
महाड सत्याग्रह काय आहे ?
महाड सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
• महाड सत्याग्रह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 1927 मध्ये झालेले एक ऐतिहासिक आंदोलन होते
• त्या काळात दलित समाजाला सार्वजनिक ठिकाणांवर, विशेषतः पाण्याच्या स्रोतांवर, प्रवेश करण्यास मनाई होती.
• या अन्यायकारक प्रथेला विरोध करून समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा सत्याग्रह उभा राहिला.
🎯 हा संघर्ष उभा राहण्यामागचं कारण काय होतं ?
• 1923 मध्ये एस. के. बोले यांनी बॉम्बे विधान परिषदेत एक महत्त्वाचा ठराव मांडला.
• या ठरावानुसार सार्वजनिक विहिरी, तलाव आणि धर्मशाळा सर्वांसाठी खुली असावीत, असे सांगण्यात आले.
• 1924 मध्ये महाड नगरपालिकेने हा ठराव मान्य केला, पण प्रत्यक्षात उच्चवर्णीयांच्या विरोधामुळे दलितांना चवदार तळ्यातून पाणी घेता येत नव्हते.
• म्हणूनच कायद्याने अधिकार मिळूनही तो वापरता येत नव्हता — हेच या आंदोलनाचे तात्काळ कारण होते.
⚙️ महाड सत्याग्रहात नेमकं काय घडलं ?
• 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो लोकांसह चवदार तळ्याकडे शांततेत मोर्चा काढला.
• त्यांनी स्वतः त्या तळ्यातील पाणी पिऊन शतकानुशतकांच्या अस्पृश्यतेच्या प्रथेला थेट आव्हान दिले.
• या घटनेनंतर उच्चवर्णीय समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटली.
• आंदोलनकर्त्यांबरोबर संघर्ष झाला आणि तळ्याचे तथाकथित “शुद्धीकरण” करण्यात आले.
• यानंतर डिसेंबर 1927 मध्ये डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले, ज्यातून त्यांनी जातीय व्यवस्थेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
• शेवटी, दीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर 1937 मध्ये बॉम्बे हायकोर्टाने निर्णय देत चवदार तळे सर्वांसाठी खुले असल्याचे घोषित केले.

🎯 या आंदोलनाचे महत्त्व काय आहे ?
• महाड सत्याग्रह हा केवळ पाण्याचा प्रश्न नव्हता, तर तो मानवी सन्मान, समानता आणि सामाजिक न्यायाचा लढा होता.
• या आंदोलनामुळे दलित चळवळीत एक मोठा बदल झाला.
• पूर्वी अर्ज आणि विनंत्या केल्या जात होत्या, पण आता थेट कृती करण्याचा मार्ग स्वीकारला गेला.
• यामध्ये महिलांचाही सक्रिय सहभाग होता, ज्यामुळे हा आंदोलन सामाजिक आणि स्त्रीवादी दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरतो.
🏛️ संविधानाशी या घटनेचा काय संबंध आहे ?
• महाड सत्याग्रहातून मांडले गेलेले समानतेचे विचार पुढे भारतीय संविधानाचा भाग बनले.
विशेषतः:
✍️ कलम 15 – भारतीय संविधानातील कलम 15 हे 'समानतेच्या हक्काचा' एक महत्त्वाचा भाग असून ते केवळ धर्म, वंश, जात, लिंग, किंवा जन्मस्थान या आधारावर नागरिकांमध्ये भेदभाव करण्यास मनाई करते.
✍️ कलम 17 – 'अस्पृश्यता नष्ट' नष्ट करणे. (Abolition of Untouchability)
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : महाड सत्याग्रह
• महाड सत्याग्रह — 20 मार्च 1927
• नेतृत्व — डॉ. बाबासाहेब आंबेडकर
• ठिकाण — महाड (चवदार तळे)
• मुख्य मुद्दा — सार्वजनिक पाण्यावर समान हक्क
• घटना — मनुस्मृती दहन (1927), न्यायालयीन विजय (1937)
• संविधान संदर्भ — कलम 15 व 17
• ‘सामाजिक सशक्तीकरण दिन’ - 20 मार्च



















