
चालू घडामोडी | आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिन
PRESIDENT OF INDIA GRACES INTERNATIONAL SICKLE CELL DAY COMMEMORATION AT OMKARESHWAR, MADHYA PRADESH
International Sickle Cell Day 2026
📚 Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) सिकलसेल (Sickle Cell) या अनुवांशिक आजारामध्ये रुग्णाच्या शरीरातील कोणत्या पेशींच्या मूळ आकारात बदल होऊन त्या विळ्यासारख्या किंवा चंद्रकोरीसारख्या बनतात ?
- लाल रक्तपेशी
- पांढऱ्या रक्तपेशी
- रक्तपट्टीका
- प्लाझ्मा पेशी
उत्तर : लाल रक्तपेशी
📰 बातमी काय ?
• 'आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिना'निमित्त (International Sickle Cell Day 2026), राष्ट्रपतींनी 'राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मिशन' (NSCEM) अंतर्गत वर्ष 2047 पूर्वी भारतातून सिकलसेल पूर्णपणे नष्ट करण्याच्या ध्येयाचा पुनरुच्चार केला आहे.

🧐 आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिन (International Sickle Cell Day) केव्हा असतो आहे ?
• सिकलसेल आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लवकर निदान, उपचार व प्रतिबंधाला चालना देण्यासाठी दरवर्षी 19 जून रोजी हा दिवस साजरा केला जातो.
• मान्यता — संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) 22 डिसेंबर 2008 रोजी एका ठरावाद्वारे या आजाराला एक प्रमुख जागतिक सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून मान्यता दिली.
🧐 2026 साठी आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनाची संकल्पना (थीम) कोणती ?
• यंदाच्या वर्षाची मुख्य थीम "क्लोजिंग द सर्व्हायव्हल गॅप: इक्विटी इन सिकलसेल डिसीज" (Closing the Survival Gap: Equity in Sickle Cell Disease) अशी आहे.
• या थीमचा मुख्य उद्देश जगभरातील सिकलसेल रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांमधील तफावत आणि असमानता दूर करणे हा आहे.
• प्रत्येकाला वेळेवर निदान आणि दर्जेदार उपचार मिळावेत यावर यात भर दिला गेला आहे.

📚📚 विज्ञान आणि तंत्रज्ञान संदर्भ -
🤔 सिकलसेल विकार (Sickle Cell Disorder) नक्की काय असतो ?
1) विकाराचे स्वरूप — सिकलसेल हा एक वारसाहक्काने मिळणारा (Inherited) हिमोग्लोबिनचा विकार आहे. हा जनुकीय उत्परिवर्तनामुळे (Genetic Mutation) होतो.
2) हिमोग्लोबिनमधील मूळ बदल — निरोगी व्यक्तीमध्ये सामान्य हिमोग्लोबिन (HbA) असते, तर सिकलसेल रुग्णामध्ये उत्परिवर्तनामुळे हिमोग्लोबिन एस (HbS) तयार होते.
• हे हिमोग्लोबिन एस ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर शरीरात एकत्र जमते आणि पेशींचा आकार बदलून टाकते.
3) विळ्यासारखा आकार — या बदलामुळे आपल्या शरीरातील नेहमीच्या गोल लाल रक्तपेशी (Red Blood Cells) गोल न राहता विळ्यासारख्या किंवा चंद्रकोरीसारख्या (Sickle or Crescent-shaped) होतात.
4) अनुवांशिक प्रकार (Type of Disease) —
• हा एक 'ऑटोसोमल रिसेसिव्ह' (Autosomal Recessive) विकार आहे.
• याचा अर्थ असा की, मुलामध्ये हा आजार दिसण्यासाठी त्याला आई आणि वडील या दोघांकडूनही दोष असलेले जनुक (Gene) मिळणे आवश्यक असते. जर फक्त एका पालकाकडून हे जनुक मिळाले, तर तो व्यक्ती फक्त 'वाहक' (Carrier) बनतो, त्याला आजार होत नाही.

🧐 सिकलसेल ॲनिमिया या आजाराचा रुग्णाच्या शरीरावर आणि आरोग्यावर काय परिणाम होतो ?
• रक्ताभिसरणात अडथळा — या बदललेल्या लाल रक्तपेशी कडक आणि चिकट बनतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधून त्यांचा प्रवाह सुरळीत होत नाही आणि रक्ताभिसरण (Circulation) खंडित होते.
• ऑक्सिजनचा तुटवडा — रक्त गोठल्यामुळे शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत होतो.
• आरोग्यावरील दुष्परिणाम — यामुळे रुग्णाला तीव्र ॲनिमिया (रक्ताल्पता) होतो, शरीराचे अवयव निकामी होतात, वारंवार असह्य वेदना (Pain Episodes) होतात आणि रुग्णाचे आयुर्मान कमी होते.
🔹 भारताचे राष्ट्रीय प्रयत्न : 'राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मिशन'
1) मिशनची पार्श्वभूमी — सिकलसेल आजाराचे मोठे ओझे, विशेषतः आदिवासी लोकसंख्येमधील याचे गंभीर प्रमाण लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2023 मध्ये हे मिशन सुरू केले.
2) निर्मूलनाचे उद्दिष्ट — भारताला वर्ष 2047 पर्यंत सिकलसेल मुक्त करण्याचे ध्येय आहे.
3)अंमलबजावणी व लक्ष्य — हे मिशन 'राष्ट्रीय आरोग्य मिशन' (NHM) अंतर्गत भारतातील 17 हाय-फोकस राज्यांमध्ये राबवले जात आहे. या अंतर्गत 3 वर्षांत (2023-26) 0 ते 40 वयोगटातील अंदाजे 7 कोटी लोकांची तपासणी (Screening) करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
4) संयुक्त मंत्रालय — हे मिशन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय यांच्याद्वारे संयुक्तपणे राबवले जात आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : International Sickle Cell Day
• आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिन → 19 जून
• आजाराचा प्रकार → ऑटोसोमल रिसेसिव्ह (आई-वडील दोन्हींकडून जनुक आवश्यक)
• तयार होणारे सदोष हिमोग्लोबिन → हिमोग्लोबिन एस (HbS)
• भारताचे प्रयत्न → 'राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मिशन'
• सिकलसेल निर्मूलनाचे लक्ष्य वर्ष → 2047
• अंमलबजावणी मंत्रालय → आरोग्य मंत्रालय + आदिवासी व्यवहार मंत्रालय























