
चालू घडामोडी | अटल पेन्शन योजना सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

Cabinet approves for continuation of Atal Pension Yojana
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अटल पेन्शन योजना कोणत्या वयोगटातील नागरिकांसाठी लागू आहे ?
1. 21 ते 60 वर्षे
2. 18 ते 40 वर्षे
3. 25 ते 55 वर्षे
4. 18 ते 60 वर्षे
उत्तर : 18 ते 40 वर्षे
📰 बातमी काय ?
• पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळा ने अटल पेन्शन योजना 2030–31 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे.
• यासोबतच योजनेच्या जनजागृती मोहिमा, तांत्रिक विकास आणि आर्थिक तुटीची भरपाई (Gap Funding) यासाठी अतिरिक्त सरकारी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
• हा निर्णय असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत करतो.
🔍 मूळ समस्या / गरज :
• भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार असंघटित क्षेत्रात कार्यरत आहेत.
• या वर्गासाठी निवृत्तीनंतर निश्चित उत्पन्नाचा कोणताही स्थिर आधार नसतो.
• हीच अडचण दूर करण्यासाठी अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली.
📘 अटल पेन्शन योजना म्हणजे काय ?
• अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची स्वेच्छेने सहभागी होता येणारी सामाजिक सुरक्षा योजना आहे.
• या योजनेअंतर्गत नागरिकांनी कामकाजाच्या वयात नियमित योगदान दिल्यास,
• वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा निश्चित पेन्शन मिळते.
• यामुळे वृद्धापकाळात आर्थिक अवलंबित्व कमी होते.
अटल पेन्शन योजना केव्हा सुरू करण्यात आली ?
• ही योजना 9 मे 2015 रोजी सुरू करण्यात आली.
🎯अटल पेन्शन योजनेची उद्दिष्टे :
• असंघटित क्षेत्रातील नागरिकांना वृद्धापकाळात निश्चित उत्पन्नाची हमी देणे.
• यासोबतच नागरिकांमध्ये दीर्घकालीन बचत आणि आर्थिक शिस्त निर्माण करणे हे या योजनेची उद्दिष्टे आहेत.
🏛️ कायदेशीर व प्रशासकीय चौकट :
• या योजनेचे प्रशासन Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA) करते.
• योजनेची अंमलबजावणी देशभरातील बँका आणि पोस्ट ऑफिस यांच्या माध्यमातून केली जाते.
• सदस्यांचे योगदान PFRDA च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मान्यताप्राप्त पेन्शन फंडांमध्ये गुंतवले जाते.
⚙️ योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये :
• अटल पेन्शन योजनेअंतर्गत सदस्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1,000 ते ₹5,000 रूपयांपर्यंत हमखास मासिक पेन्शन मिळते.
• पात्रता : या योजनेसाठी 18 ते 40 वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक पात्र असतात.
• योगदान : सदस्यांनी आपल्या बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्यातून मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही पद्धतीने योगदान द्यावे लागते.
• सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच पेन्शनचा लाभ पती किंवा पत्नीस मिळतो, आणि
• त्यानंतर जमा झालेली रक्कम नामनिर्देशित व्यक्तीस दिली जाते.
• अपात्रता : महत्त्वाची बाब म्हणजे, 1 ऑक्टोबर 2022 नंतर आयकर भरणारे नागरिक नवीन नोंदणीस पात्र नाहीत.
🌱 अटल पेन्शन योजनेचे महत्त्व :
• ही योजना असंघटित क्षेत्रातील कोट्यवधी कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कवच ठरते.
• ही योजना वृद्धापकाळात आर्थिक सन्मान आणि स्वावलंबन देते.
• त्यामुळे भारताचा प्रवास हळूहळू “पेंशनधारक समाज” (pensioned society) कडे होत आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• योजना सुरू : 9 मे 2015
• पात्र वयोगट : 18–40 वर्षे
• पेन्शन सुरू होण्याचे वय : 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर
• मासिक पेन्शन : ₹1,000 ते ₹5,000
• अंमलबजावणी संस्था : PFRDA
• 2022 नंतर आयकर भरणाऱ्यांसाठी नवीन नोंदणी बंद
• 2030–31 पर्यंत योजना सुरू ठेवण्यास कॅबिनेट मंजुरी




















