
चालू घडामोडी | BPAN म्हणजे काय ?

What is BPAN ?
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्यांच्या संपूर्ण जीवनचक्राचा मागोवा घेण्यासाठी केंद्र सरकारने कोणती नवी प्रणाली प्रस्तावित केली आहे ?
1. National EV Recycling Code
2. Battery Pack Aadhaar Number
3. Green Battery Certification
4. EV Battery Rating System
उत्तर : Battery Pack Aadhaar Number (BPAN)
बातमी काय ?
• रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्यांसाठी Battery Pack Aadhaar Number (BPAN) ही आधारसारखी ओळख प्रणाली प्रस्तावित केली आहे.
• या व्यवस्थेमुळे प्रत्येक EV बॅटरीला एक अद्वितीय क्रमांक देऊन तिचा उत्पादनापासून ते पुनर्वापर किंवा विल्हेवाटीपर्यंतचा संपूर्ण प्रवास नोंदवता येणार आहे.
मूळ मुद्दा नेमका काय ?
• भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वेगाने वाढत आहे.
• त्याच वेळी लिथियम-आयन बॅटऱ्यांच्या वापरानंतर काय करायचे हा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
• आतापर्यंत बॅटरी कुठे तयार झाली, किती काळ वापरली गेली आणि शेवटी तिचे काय झाले याचा केंद्रीकृत व विश्वासार्ह मागोवा नव्हता.
• हीच पोकळी भरून काढण्यासाठी BPAN प्रणाली पुढे आणण्यात आली आहे.
Battery Pack Aadhaar Number (BPAN) म्हणजे काय ?
• BPAN हा प्रत्येक बॅटरी पॅकला दिला जाणारा 21 अंकी अद्वितीय ओळख क्रमांक आहे.
• हा क्रमांक बॅटरीसाठी डिजिटल ओळखपत्रासारखे काम करतो.
• बॅटरी तयार झाल्यापासून ती वाहनात वापरणे, तिची कार्यक्षमता, पुनर्वापरासाठी देणे किंवा अंतिम विल्हेवाट लावणे — हे सर्व टप्पे या क्रमांकाद्वारे नोंदवले जातात.

BPAN प्रणाली का आवश्यक ठरली ?
• BPAN प्रणालीमुळे बॅटऱ्यांचा पूर्ण मागोवा ठेवता येणार आहे.
• त्यामुळे वापर संपलेल्या बॅटऱ्यांचा योग्य रीसायकलिंग करता येईल आणि वापरण्यायोग्य बॅटऱ्यांचा दुसऱ्या कामासाठी पुनर्वापर शक्य होईल.
• तसेच लिथियम-आयन बॅटऱ्यांची (Lithium-Ion Batteries) चुकीची विल्हेवाट लावल्यामुळे होणारे आग, प्रदूषण आणि आरोग्याचे धोके कमी होतील.
• या प्रक्रियेमुळे बॅटरी तयार करणाऱ्या कंपन्यांची जबाबदारी निश्चित होईल आणि Extended Producer Responsibility (EPR) प्रभावीपणे राबवता येईल.
BPAN प्रणाली कशी काम करेल ?
• या प्रस्तावानुसार प्रत्येक बॅटरी उत्पादक किंवा आयातदाराने आपल्या बॅटरीला BPAN देणे बंधनकारक असेल.
• बॅटरीशी संबंधित संपूर्ण माहिती सरकारच्या अधिकृत ऑनलाईन प्रणालीवर नोंदवली जाईल.
• जर बॅटरीमध्ये मोठा तांत्रिक बदल झाला, तर नवीन BPAN देणे आवश्यक राहील.
• हा क्रमांक बॅटरीवर अशा ठिकाणी लिहिला जाईल की तो सहज नष्ट होणार नाही.
• सुरुवातीला देशातील लिथियम-आयन बॅटऱ्यांच्या मोठ्या वापरामुळे EV बॅटऱ्यांवर प्राधान्याने ही प्रणाली लागू केली जाणार आहे.
ही योजना कोणत्या मार्गाने राबवली जाणार आहे ?
• ही योजना “Battery Pack Aadhaar System” संदर्भातील मसुदा मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबवली जाणार आहे.
• यासाठी वाहन उद्योगाशी संबंधित मानके ठरवणारी Automotive Industry Standards Committee संस्था जबाबदार असेल आणि Automotive Industry Standard (AIS) मार्गाने ही प्रणाली अधिकृतपणे अंमलात आणली जाईल.


























