
चालू घडामोडी | मायोपिया महामारी
Myopia Pandemic
📚 Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - भौतिकशास्त्र, जीवशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) डोळ्यांच्या 'निकटदृष्टिता' (Myopia) या दोषाचे निवारण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या भिंगाचा (Lens) वापर केला जातो ?
- बहिर्गोल भिंग (Convex Lens)
- अंतर्गोल भिंग (Concave Lens)
- द्विनाभीय भिंग (Bifocal Lens)
- समतल भिंग (Plain Lens)
उत्तर : अंतर्गोल भिंग (Concave Lens)
📰 बातमी काय ?
• वर्ष 2050 पर्यंत जगातील सुमारे 4.75 billion (4.75 अब्ज) लोक, म्हणजेच जगाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास निम्मी लोकसंख्या 'मायोपिया'ने (निकटदृष्टिता) ग्रस्त असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
🇮🇳 भारतातील वाढती चिंता -
• भारतातील शहरी मुलांमध्ये मायोपियाचे प्रमाण 1999 मध्ये केवळ 4.44% होते, जे 2019 मध्ये वाढून 21.15% झाले आहे.
• जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार 2050 पर्यंत भारतातील जवळपास 48% शहरी मुले ‘निकटदृष्टिता’ या दोषाने प्रभावित होतील.
👁️ मायोपिया म्हणजे काय ? (What is Myopia)
• 'मायोपिया' याला मराठीत 'निकटदृष्टिता' किंवा 'लघुदृष्टी दोष' असे म्हणतात.
• हा डोळ्यांचा एक असा दोष आहे, ज्यामध्ये व्यक्तीला जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात, परंतु दूरच्या वस्तू अंधुक किंवा अस्पष्ट दिसतात.

🧐 तांत्रिक कारण (Scientific Cause) :
• हा दोष डोळ्याचा अक्षीय गोलक जास्त लांब झाल्यामुळे (Excessive Axial Elongation of the Eye) निर्माण होतो.
• निरोगी डोळ्यामध्ये प्रकाशाची किरणे थेट दृष्टिपटलावर (Retina) एकत्र येतात.
• परंतु, मायोपिया झालेल्या डोळ्यामध्ये अक्षीय लांबी (डोळ्याचा पुढचा व मागचा भाग यांमधील अंतर) जास्त वाढल्यामुळे दूरवरून येणारे प्रकाश किरण दृष्टिपटलाच्या (Retina) थेट वर पडण्याऐवजी त्याच्या अलीकडेच (In Front of the Retina) केंद्रित होतात, यामुळे दूरचे दृश्य अंधुक दिसते.
✍️ भौतिकशास्त्र संदर्भ (Physics Concept) -
• अंतर्गोल भिंग (Concave Lens) - मायोपिया किंवा निकटदृष्टिता हा दोष दूर करण्यासाठी चष्म्यात किंवा कॉन्टॅक्ट लेन्समध्ये अंतर्गोल भिंगाचा (Concave Lenses) वापर केला जातो.
• कार्यपद्धती - अंतर्गोल भिंग हे अपसारी (Diverging) भिंग असते. ते दूरवरून येणाऱ्या प्रकाश किरणांना थोडे पसरवते, ज्यामुळे प्रकाशाचा फोकस योग्य ठिकाणी म्हणजेच परत थेट दृष्टिपटलावर (Retina) पडतो आणि दृष्टी पूर्ववत स्पष्ट होते.
🧐 'निकटदृष्टिता' दोषामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि धोके (Health Concerns):
A) हाय मायोपिया (High Myopia) - जेव्हा डोळ्याचा अपवर्तन दोष -6 डायोप्टर (-6 dioptres) किंवा त्याहून अधिक वाढतो, तेव्हा त्याला 'हाय मायोपिया' म्हणतात.
यामुळे डोळ्यांची दृष्टी कायमची जाण्याचा किंवा अंधत्व (Blindness) येण्याचा गंभीर धोका असतो.
B) डोळ्यांच्या ऊतींचे नुकसान - डोळ्याचा अक्षीय गोलक जास्त लांब झाल्यामुळे डोळ्यातील महत्त्वाचे पडदे जसे की, दृढपटल (Sclera), रक्तपटल (Choroid) आणि दृष्टिपटल (Retina) ताणले जातात व पातळ होतात.
यामुळे खालील गंभीर आजारांचा धोका वाढतो.
1) Retinal Detachment : दृष्टिपटल आपल्या जागेवरून बाजूला होणे.
2) Glaucoma : काचबिंदू (डोळ्यातील अंतर्गत दाब वाढणे).
3) Early Cataract : वेळेपूर्वी किंवा लवकर मोतीबिंदू होणे.
4) Myopic Macular Degeneration : दृष्टीच्या मुख्य केंद्राचा ऱ्हास होणे.

⛳️ प्रतिबंधात्मक उपाय (Prevention) :
1) मैदानी खेळांना प्राधान्य (Outdoor Time): वैज्ञानिक संशोधनानुसार, मुलांनी घराबाहेर किंवा नैसर्गिक सूर्यप्रकाशात (Outdoor time) जास्त वेळ घालवल्यास मायोपिया वाढण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
2) नियमित तपासणी : शालेय वयाच्या मुलांची डोळ्यांची नियमित तपासणी (Regular eye exams) करणे लवकर निदानासाठी अत्यंत आवश्यक आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : 'निकटदृष्टिता' (Myopia)
• मायोपियाचे मराठी नाव → निकटदृष्टिता; जवळचे स्पष्ट दिसते, दूरचे अस्पष्ट दिसते.
• निकटदृष्टिता → जवळचे स्पष्ट दिसते, दूरचे अस्पष्ट दिसते.
• प्रकाश किरण कुठे केंद्रित होतात → दृष्टीपटलाच्या (Retina) समोर.
• दोष निवारणासाठी वापरले जाणारे भिंग → अंतर्वक्र भिंग (Concave Lens).
• हाय मायोपियाची तांत्रिक व्याख्या → चष्म्याचा नंबर -6 डायोप्टर किंवा त्याहून अधिक असणे.
• भारतातील 2050 चा अंदाज → जवळपास 48% शहरी मुलांना मायोपिया होण्याचा धोका.
















