
चालू घडामोडी | महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा, 2026
Maharashtra Women Farmers Empowerment Act, 2026
📚 Subject : GS - राज्यशास्त्र - कायदे, सरकारी योजना - उपक्रम, अर्थशास्त्र - कृषी अर्थव्यवस्था, महिला सक्षमीकरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकत्याच संमत झालेल्या 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा, 2026' च्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या सर्वोच्च नियामक परिषदेचे (Governing Council) अध्यक्ष खालीलपैकी कोण असतील ?
1. राज्याचे मुख्यमंत्री
2. राज्याचे महिला व बालविकास मंत्री
3. राज्याचे कृषी मंत्री
4. राज्याचे मुख्य सचिव
उत्तर : राज्याचे मुख्यमंत्री
📰 बातमी काय ?
• महिला शेतकऱ्यांना औपचारिक कायदेशीर मान्यता देण्यासाठी आणि त्यांना शासकीय योजना, संस्थात्मक कर्ज व कृषी सुविधांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा, 2026' (Maharashtra Women Farmers Empowerment Act, 2026) संमत करण्यात आला आहे.
• महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी असा स्वतंत्र व समर्पित कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
🧐 कायद्याची पार्श्वभूमी आणि गरज :
1) शेतीमधील महिलांचे प्रचंड योगदान (PLFS 2025 अहवाल) :
• महाराष्ट्र - राज्यातील ग्रामीण भागातील तब्बल 82% कार्यरत महिला शेती व संलग्न क्षेत्रावर अवलंबून आहेत (याउलट ग्रामीण पुरुषांचे प्रमाण 58% आहे).
• अखिल भारतीय स्तर : देशात ग्रामीण भागातील 73% कार्यरत महिला शेतीत आहेत (ग्रामीण पुरुषांचे प्रमाण 47% आहे).
2) समस्या : शेतीत बहुतांश काम महिला करत असूनही, जमिनीची मालकी (7/12 उतारा) स्वतःच्या नावावर नसल्यामुळे त्यांना शासकीय योजना, पीक कर्ज, विमा आणि अनुदानापासून वंचित राहावे लागत होते.
🎯 कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये आणि तरतुदी (Key Features of the Act) :
1) महिला शेतकरी प्रमाणपत्र (Woman Farmer Certificate - WFC) -
• शेती व संलग्न व्यवसायात काम करणाऱ्या पात्र महिला ग्रामसभा किंवा नगरपंचायतीमार्फत 'महिला शेतकरी प्रमाणपत्रा'साठी (WFC) अर्ज करू शकतील.
2) जमिनीच्या मालकीची अट रद्द -
• या प्रमाणपत्रामुळे महिलांची शेतकरी म्हणून ओळख ही जमिनीच्या मालकीपासून (Land Titles) वेगळी करण्यात आली आहे. म्हणजेच जमिनीवर नाव नसले तरी प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलेला शेतकरी म्हणून कायदेशीर दर्जा मिळेल.
3) शेतकऱ्याची व्यापक व्याख्या (National Policy for Farmers, 2007 नुसार) :
• केवळ पीक उत्पादनच नव्हे, तर पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, कृषी-वनीकरण (Agroforestry), गांडूळ खत निर्मिती, मशरूम शेती आणि प्राथमिक कृषी प्रक्रिया करणाऱ्या महिलांचाही यात समावेश असेल.
🏛️ अंमलबजावणी यंत्रणा आणि संस्थात्मक रचना कशी असेल ?
• महिला शेतकऱ्यांची डिजिटल नोंदणी (Digital Registry).
• विशेष समर्पित निधीची (Special Fund) स्थापना.
• राज्य महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष आणि जिल्हा व तालुका स्तरावर विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती.
🤔 देखरेख व सनियंत्रण रचना (Monitoring Structure) :
• नियामक परिषद (Governing Council) - मुख्यमंत्र्यांच्या (Chief Minister) अध्यक्षतेखाली सर्वोच्च परिषद.
• राज्यस्तरीय संनियंत्रण समिती - मुख्य सचिवांच्या (Chief Secretary) अध्यक्षतेखाली अंमलबजावणी समिती.
📚📚 संदर्भ - Static GS - अर्थशास्त्र - कृषी अर्थव्यवस्था, महिला सक्षमीकरण
🤔 कृषीचे स्त्रीकरण (Feminisation of Agriculture) म्हणजे काय ?
• शेती आणि संलग्न क्षेत्रांमध्ये (पशुपालन, दुग्धव्यवसाय, फलोत्पादन) पुरुषांच्या तुलनेत महिला शेतकऱ्यांचे आणि महिला शेतमजुरांचे प्रमाण, सहभाग आणि प्रत्यक्ष जबाबदारी सातत्याने वाढणे, या प्रक्रियेला 'कृषीचे स्त्रीकरण' (Feminisation of Agriculture) म्हणतात.
• व्याप्ती - यामध्ये केवळ शेतात शारीरिक मजुरी करणे एवढाच अर्थ नसून; बियाणे निवड, पेरणी, निंदणी, कापणी, साठवणूक आणि जनावरांची देखभाल यांसारख्या शेतीच्या बहुतांश मुख्य टप्प्यांचे व्यवस्थापन महिलांच्या हाती येणे समाविष्ट आहे.
🤔 कृषीचे स्त्रीकरण घडण्याची मुख्य कारणे कोणती ?
1) ग्रामीण भागातून पुरुषांचे शहरांकडे स्थलांतर (Male Out-Migration) :
• ग्रामीण भागातील पुरुष बिगर-कृषी रोजगार, उद्योग, बांधकाम क्षेत्र किंवा शहरांमध्ये नोकरीच्या शोधात स्थलांतरित होतात.
• परिणामी, गावातील वडिलोपार्जित शेती सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी घरातील महिलांवर येते.
2) शेतीचे घटते उत्पन्न आणि अर्थसंकट (Agrarian Distress) :
• शेतीतील अनिश्चित हवामान आणि कमी नफ्यामुळे कुटुंबाला पूरक उत्पन्न मिळवण्यासाठी पुरुष शहरात जातात, तर महिला शेतीचा खर्च कमी करण्यासाठी स्वतः शेतात राबतात.
3) मजुरी खर्चातील बचत :
• अनेक अल्प व अत्यल्प भूधारक कुटुंबांमध्ये बाहेरून मजूर लावण्याऐवजी घरातील महिलाच शेतीतील सर्व कामे विनामोबदला (Unpaid Family Labour) करतात.
4) कमी मजुरीचा दर :
• मोठ्या शेतमालकांना पुरुष मजुरांच्या तुलनेत महिला मजूर कमी मजुरी दरात उपलब्ध होतात, ज्यामुळे महिला शेतमजुरांची मागणी वाढते.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Maharashtra Women Farmers Act 2026
• कायदा करणारे देशातील पहिले राज्य → महाराष्ट्र
• कायद्याचे नाव → महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा, 2026
• मुख्य साधन → महिला शेतकरी प्रमाणपत्र (Woman Farmer Certificate)
• सर्वात मोठा बदल → शेतकरी ओळखीसाठी 7/12 किंवा जमिनीच्या मालकीची अट रद्द
• PLFS 2025 प्रमाण → महाराष्ट्रात 82% ग्रामीण महिला शेतीमध्ये कार्यरत
• सर्वोच्च नियामक परिषदेचे अध्यक्ष → मुख्यमंत्री
• राज्यस्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष → मुख्य सचिव



















