
चालू घडामोडी | International Snow Leopard Day | आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन

International Snow Leopard Day
आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन
Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘#23for23 Initiative’ ही मोहीम खालील पैकी कोणत्या प्राण्याच्या संवर्धनाशी संबंधित आहे ?
1. वाघ
2. हिम बिबट्या
3. हत्ती
4. लाल पांडा
उत्तर : हिम बिबट्या (Snow Leopard)
बातमी काय ?
• भारताने ‘#23for23 Initiative’ या मोहिमेसह आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिवस (International Snow Leopard Day) साजरा केला.
• या उपक्रमाचा उद्देश हिम बिबट्या संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा आहे.
आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिवस केव्हा असतो ?
• दरवर्षी 23 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन साजरा केला जातो.
• या दिवसाचा उद्देश हिम बिबट्यांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हा आहे.
बिश्केक घोषणापत्र म्हणजे ?
आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन 23 ऑक्टोबरलाच का साजरी करतात ?
• 23 ऑक्टोबर 2013 रोजी, किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे हिम बिबट्यांचे (Snow Leopard) संरक्षण करण्यासाठी 12 देशांनी एकत्र येऊन पुढाकार घेतला.
• भारत, पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, , मंगोलिया, रशिया, अफगाणिस्तान, किर्गिस्तान, कझाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे ते 12 देश आहेत.
• हिम बिबट्या आणि त्यांच्या नाजूक अधिवासांचे संवर्धन करण्यासाठी तातडीने सामूहिक कृतीची गरज असल्याचे या 12 देशांनी मान्य केले यालाच बिश्केक घोषणापत्र (Bishkek Declaration) म्हणून ओळखले जाते.
हिम बिबट्या बद्दल महत्त्वाची माहिती :
• वैज्ञानिक नाव (Scientific name) : Panthera Uncia
• टोपणनाव : हिम बिबट्याला "पर्वताचा भूत" (Ghost of the Mountains) म्हणूनही ओळखले जाते.
• स्वभाव : एकाकी, लाजाळू व थंड हवामानास अनुरूप प्राणी.
• वास्तव्य : आशियातील उंच पर्वतीय प्रदेश — भारत, नेपाळ, भूतान, चीन आणि मध्य आशियातील काही देश.

हिम बिबट्या भारतात सर्वाधिक कुठे आढळतो ?
• भारतीय हिमालयातील पहिल्या हिम बिबट्या वैज्ञानिक गणना अहवालानुसार (Snow Leopard Population Assessment)
भारतात 718 हिम बिबटे आहेत, त्यापैकी 477 एकट्या लडाखमध्ये आहेत.
जैविक व संवर्धनात्मक महत्त्व :
• हिम बिबट्या जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाचा प्राणी असुन परिसंस्थेत वरच्या स्तरावरील शिकारी म्हणून पर्यावरणीय समतोल राखतो.
हिम बिबट्यांची संख्या कमी होण्याची कारणे कोणती ?
हिम बिबट्यांना (Snow Leopard) मुख्य धोके कोणते ?
आवास नष्ट होणे (Habitat Loss) :
• हिमालयीन आणि उंच पर्वतीय प्रदेशांमध्ये मानवी हस्तक्षेप, शेती व पायाभूत विकासामुळे त्यांचे नैसर्गिक अधिवास कमी होत आहेत.
शिकार व अवैध व्यापार (Poaching & Illegal Trade) :
• त्यांच्या कातडी, हाडे आणि अवयवांच्या अवैध व्यापारासाठी शिकार केली जाते.
भक्ष्याची कमतरता (Prey Depletion) :
• नैसर्गिक भक्ष्य प्रजाती जसे की नीलगाय, भरल, इबेक्स यांच्या संख्येत घट झाल्याने हिम बिबट्यांचे अन्नस्रोत कमी झाले आहेत.
मानव–वन्यजीव संघर्ष (Human–Wildlife Conflict) :
• गावाजवळील मेंढ्या, बकऱ्यांवर हल्ला केल्यास स्थानिक लोक बदला घेऊन बिबट्यांची शिकार करतात.
हवामान बदल (Climate Change) :
• हवामानातील बदलामुळे बर्फ वितळणे, वनस्पतींची रचना बदलणे यामुळे हिम बिबट्यांच्या अधिवासात मोठे परिवर्तन होत आहे.
सीमावर्ती अस्थिरता (Cross-border Challenges) :
• हिम बिबटे अनेक देशांच्या सीमेवर आढळतात, त्यामुळे एकत्रित संरक्षण धोरण राबवणे कठीण ठरते.
हिम बिबट्याची संवर्धन स्थिती :
• IUCN Red list : हिम बिबट्या IUCN च्या संकटग्रस्त (Vulnerable) वर्गात समाविष्ट आहे
• CITES : Convention on International Trade in Endangered Species च्या Appendix I मध्ये समाविष्ट.
• CMS : Convention on Migratory Species मध्येही सूचीबद्ध.
• भारताच्या वन्यजीव अधिनियम कायदा 1972 (Wildlife Protection Act, 1972) अंतर्गत हिम बिबट्या संरक्षित म्हणून घोषित.
























