What is the "Mountbatten Plan"?
📚 Subject : GS - आधुनिक भारताचा इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ब्रिटिश राजवटीत भारताची फाळणी करून भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र देशांची निर्मिती करणारी 'माउंटबॅटन योजना' अधिकृतपणे कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आली होती ?
- 22 मार्च 1947
- 3 जून 1947
- 15 ऑगस्ट 1947
- 26 जानेवारी 1950
उत्तर : 3 जून 1947
📰 बातमी काय ?
3 जून 2026 रोजी भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या ऐतिहासिक '3 जून 1947 च्या घोषणेला' (Mountbatten Plan) 79 वर्षे पूर्ण झाली आहेत.
📜 पार्श्वभूमी (Background):
1) व्हाइसरॉयची नियुक्ती - ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट अॅटली यांनी 22 मार्च 1947 रोजी लॉर्ड लुईस माउंटबॅटन यांची भारताचे शेवटचे व्हाइसरॉय म्हणून नियुक्ती केली.
त्यांच्यावर जून 1948 पर्यंत भारतीयांच्या हाती सत्ता सोपवण्याची जबाबदारी होती.


2) देशातील हिंसाचार - परंतु, या काळात देशातील परिस्थिती झपाट्याने बिघडत चालली होती. खालील घटनांमुळे देशभरात भीषण जातीय दंगली आणि हिंसाचार उसळला होता -
• द ग्रेट कलकत्ता किलिंग्ज (August 1946)
• नोआखली (बांगलादेश) आणि बिहारमधील दंगली
• मुंबई (बॉम्बे) मधील अशांतता
• पंजाबमधील अमृतसर, रावळपिंडी आणि तक्षशिला येथील वाढता हिंसाचार
3) माउंटबॅटन यांचा निष्कर्ष - या भीषण हिंसाचारानंतर लॉर्ड माउंटबॅटन यांच्या हे लक्षात आले की, अखंड भारत राजकीयदृष्ट्या एकत्र ठेवणे आता शक्य नाही आणि मुस्लिम लीगची 'पाकिस्तान'ची मागणी नाकारता येणार नाही.
🧐 'प्लॅन बाल्कन' काय आहे ? तो रद्द का करण्यात आला ?
• माउंटबॅटन यांनी सुरुवातीला प्रत्येक प्रांताला स्वतंत्र होण्याचा अधिकार देणारा 'प्लॅन बाल्कन' (Plan Balkan) तयार केला होता.
• राष्ट्रीय कॉंग्रेस ने त्याला कडाडून विरोध केला, कारण यामुळे भारताचे शेकडो तुकडे झाले असते.
• म्हणून उर्वरित भारताची अखंडता राखण्यासाठी 'प्लॅन बाल्कन' रद्द करून माउंटबॅटन यांनी फाळणीचा नवा आराखडा मांडला.
🤔 माउंटबॅटन योजना' (Mountbatten Plan) काय आहे ?
• "माउंटबॅटन योजना" (Mountbatten Plan), जिला '3 जून योजना' (3 June Plan) किंवा '3 जूनची घोषणा' असेही म्हटले जाते, हा भारताच्या आधुनिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा आहे.
• या योजनेने अखंड भारताची फाळणी करून भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र देशांची निर्मिती निश्चित केली.

🧐 3 जून योजनेतील ("माउंटबॅटन योजना") मुख्य तरतुदी :
लॉर्ड माउंटबॅटन, जवाहरलाल नेहरू, मोहम्मद अली जिना आणि बलदेव सिंग यांनी रेडिओवरून या ऐतिहासिक योजनेची घोषणा केली, यातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे होते :
1) फाळणीचा स्वीकार - ब्रिटिश सरकारने अखेर भारताची भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र अधिराज्यांमध्ये (Dominions) फाळणी करण्याचे तत्त्व मान्य केले.
2) पंजाब आणि बंगालचा निर्णय - पंजाब आणि बंगालच्या प्रांतिक विधानसभांमध्ये (Legislative Assemblies) फाळणी करायची की प्रांत एकत्र ठेवायचा, यावर मतदान घेण्याचे ठरले. (नंतर या दोन्ही प्रांतांची फाळणी झाली).
3) सार्वमत (Referendums) - वायव्य सरहद्द प्रांत (North-West Frontier Province) आणि आसाममधील 'सिल्हेट' (Sylhet) जिल्ह्यात नागरिक भारतात जाणार की पाकिस्तानात, हे ठरवण्यासाठी सार्वमत घेण्याचे निश्चित झाले.
4) सिंधचा निर्णय - सिंध प्रांताची विधानसभा स्वतः ठरवेल की त्यांना कोणत्या देशात सामील व्हायचे आहे.
5) सीमा आयोग (Boundary Commission) - पंजाब आणि बंगालच्या फाळणीनंतर दोन्ही देशांची अधिकृत सीमा निश्चित करण्यासाठी सर सिरिल रॅडक्लिफ (Sir Cyril Radcliffe) यांच्या अध्यक्षतेखाली एक 'सीमा आयोग' स्थापन करण्याचे ठरले.
6) संस्थानिकांचा निर्णय (Princely States) - भारतातील संस्थानांना भौगोलिक आणि प्रशासकीय परिस्थितीचा विचार करून भारत किंवा पाकिस्तान यांपैकी कोणत्याही एका देशात सामील होण्याचा सल्ला देण्यात आला.
7) स्वातंत्र्याची तारीख जवळ आणली - परिस्थितीचे गांभीर्य पाहून सत्ता हस्तांतरणाची तारीख जून 1948 वरून थेट 15 ऑगस्ट 1947 अशी जवळ आणण्यात आली.
🧐 राष्ट्रीय काँग्रेसने "माउंटबॅटन योजना" का स्वीकारली ?
1) जातीय हिंसाचार रोखणे - देशात सुरू असलेला भीषण रक्तपात आणि अराजकता केवळ तात्काळ सत्ता हाती घेतल्यानेच थांबवता येऊ शकते, असा काँग्रेस नेत्यांचा विश्वास होता.
2) मजबूत केंद्र सरकारची गरज - सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू या नेत्यांचे असे मत बनले की, जातीय कोंडीमुळे सतत विस्कळीत राहणाऱ्या अखंड भारतापेक्षा, आकाराने लहान परंतु राजकीयदृष्ट्या स्थिर असणारा भारत अधिक श्रेयस्कर आहे.
3) मौलाना आझाद यांचा संदर्भ - मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 'इंडिया विन्स फ्रीडम' (India Wins Freedom) या पुस्तकातील नोंदीनुसार, माउंटबॅटन यांनी काँग्रेस नेत्यांना पटवून दिले की, काही भूभाग गमावून एक मजबूत आणि एकसंध भारतीय संघराज्य निर्माण करणे शक्य होईल.
4) 'प्लॅन बाल्कन'ला विरोध -
माउंटबॅटन यांनी यापूर्वी एक योजना आणली होती, ज्याला 'प्लॅन बाल्कन' (Plan Balkan) म्हणतात.
या योजनेनुसार भारतातील प्रत्येक प्रांताला स्वतंत्र देश बनण्याची मुभा मिळणार होती.
भारताचे अनेक तुकडे (तुकडे-तुकडे) होणारा हा प्लॅन काँग्रेसने पूर्णपणे नाकारला आणि त्याऐवजी माउंटबॅटन योजनेला संमती दिली.
🧐 मुस्लिम लीगने "माउंटबॅटन योजना" का स्वीकारली ?
पाकिस्तानची निर्मिती - या योजनेने लीगची 1940 च्या लाहोर ठरावापासूनची मुख्य मागणी, म्हणजेच स्वतंत्र 'पाकिस्तान'ची निर्मिती अधिकृतपणे मान्य केली होती.
जिनांचा तडजोड स्वीकार - मोहम्मद अली जिना यांना पंजाब आणि बंगाल प्रांतांचे तुकडे करणे मान्य नव्हते. परंतु, शेवटी स्वतंत्र देश मिळवण्याच्या मोठ्या उद्दिष्टासाठी त्यांनी या योजनेला मान्यता दिली.
✍️ माउंटबॅटन योजनेचे परिणाम (Consequences) :
या योजनेच्या अंमलबजावणीतून संसदेत 'भारतीय स्वातंत्र्य कायदा, 1947' (Indian Independence Act, 1947) मंजूर झाला.
यानुसार 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताची निर्मिती झाली.
हा इतिहास मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या सामूहिक स्थलांतराचा (Mass Migrations) आणि भीषण मानवी शोकांतिकेचा साक्षीदार ठरला.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Mountbatten Plan
• 3 जूनच्या घोषणेचे इतर नाव → माउंटबॅटन योजना
• फाळणीचा अंतिम आराखडा जाहीर झालेली तारीख → 3 जून 1947
• सार्वमत (Referendum) घेण्यात आलेले भाग → वायव्य सरहद्द प्रांत (NWFP) आणि आसाममधील सिल्हेट जिल्हा
• भारत-पाकिस्तान सीमा निश्चित करणारे प्रमुख → सर सायरिल रॅडक्लिफ (Radcliffe Line)
• बदललेली अंतिम स्वांतत्र्य तारीख → 15 ऑगस्ट 1947
• स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती → 14 ऑगस्ट 1947
• स्वतंत्र भारताची निर्मिती → 15 ऑगस्ट 1947

